पराक्रमी नेपोलियन

                             

स्वतःच्या कर्तृत्वाने, पराक्रमाने आणि रणनीतीने जगाच्या इतिहासातील घटनांवर आपला ठसा उमटवणाऱ्या शूर योध्यांपैकी एक योद्धा म्हणजे नेपोलियन बोनापार्ट (पहिला). 15 ऑगस्ट 1769 साली कोर्सीका बेटावर नेपोलियनचा जन्म झाला नेपोलियनच्या जन्माआधीच कोर्सीका बेट फ्रान्समध्ये सामावून घेण्यात आले, नेपोलियन्चया घराण्यातील कोणीही लष्करात नव्हते, आपल्याला अवगत असलेल्या लष्करी ज्ञानाचा यथायोग्य उपयोग करुन शत्रू राष्ट्रांना नामोहरम करणारा व इतरही अशा अनेक रोमांचकारी घटनांनी आपली कारकीर्द घडवणाऱ्या नेपोलियनचे शैक्षणिक आयुष्य हे लष्करी शाळेतच गेले. त्याच्या घरची आर्थिक स्थिती हालाखीचीच होती. लष्करी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला फ्रेंच लष्करात सामील करून घेण्यात आले. लष्करात नेपोलियनला अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या.

 फ्रेंच राज्यक्रांती :- वर्षानुवर्षे चालत आलेल्या जुलमी राजवटीचा आणि हुकूमशाही विरोधात घडलेली क्रांती म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती.अनियंत्रित राजेशाही, धर्मसत्तेने घालून दिलेले सामाजिक नियम या सगळ्याविरुद्ध फ्रेंच जनता बंड करुन उठली होती. जनशक्तीपूढे धर्मशास्त्रप्राणित मूल्यांचा बिमोड होऊन नवीन सामाजिक मूल्ये उदयास आली. राजेशाही, सरंजामशाही व धर्मसत्तेच्या काळातील सामाजिक कल्पना झुगारुन दिल्या गेल्या व त्यांची जागा समता, नागरिकत्व आणि मानवी हक्क यांनी घेतली. फ्रेंच राज्यक्रांती घडून येण्यास फ्रान्समधील मॉन्टेस्क्यु या विचारवंताचे विचार कारणीभूत ठरले. कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ, व न्यायमंडळ ही क्षेत्रे स्वतंत्र असायला हवीत असे त्याचे मत होते, ज्यामुळे जीवितहानी, वित्तहानीचे नुकसान कमी होऊन स्वातंत्र्य, समता ही मूल्ये जोपासली जातील हा त्याचा सत्ता विभाजनाचा सिद्धांत मॉन्टेस्क्युने फ्रेंच जनतेमध्ये रुजवला त्यामुळेच फ्रेंच राज्यक्रांती घडून आली.

 फ्रेंच राज्यक्रांतीवेळी नेपोलियन कोर्सीका येथे होता, फ्रेंचराज्यक्रांतीत नेपोलियन जेकोबीयन या गटात होता. परंतु नंतर कोर्सीकामधील परिस्थिती बिकट होत गेली त्यामुळे त्याला कोर्सीका सोडून फ्रान्समध्ये पलायन करावे लागले. फ्रेंच लष्कराच्या अनेक लढायांमध्ये नेपोलियनने उत्कृष्ठ कामगिरी बजावली त्यामुळे त्याला लष्करात बढती मिळत गेली त्याचबरोबरीने त्याचा मानही वाढला. यानंतर नेपोलियन ने निरनिराळ्या गटातील प्रमुख क्रांतिकारकांबरोबर आपले हितसंबंध वाढवण्यास सुरुवात केली. यामध्ये ऑगस्टीन रोबस्पियर आणि मॅक्समिलन रोबस्पियर जो जेकोबीयन गटाचा क्रांतिकारी नेता होता. नंतर पॅरिसमध्ये क्रांतिकारी विरुद्ध राजेशाहीला समर्थन देणारे गट आणि क्रांतिकारी यांच्या गटामध्ये झालेल्या युद्धात नेपोलियनने बजावलेल्या कामगिरीमुळे बंडखोरांचा बिमोड झाला आणि तो महत्वपुर्ण लष्करी अधिकारी म्हणून गणला जाऊ लागला.

इटलीबरोबरच्या युद्धांतही नेपोलियनने आपल्या लष्करी युद्ध कौधल्याची चुणूक दाखवली त्याने दाखवलेल्या शौर्यामुळे त्याला पोटेट कपोरल (छोटा कार्पोरेल)असे नाव देण्यात आले. 1792 सालापासून फ्रान्सचे क्रांतिकारी सरकार विविध युरोपीय राष्ट्रांशी लष्करी संघर्ष करत हेते. फ्रेंच लष्कराने नेपोलियन्चया नेतृत्वाखालील युद्धात फ्रेंचांचा प्रमुख प्रतिस्पर्ध्यांपैकी एक असलेल्या ऑस्ट्रिया या राष्ट्राच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला ज्यामुळे नेपोलियनचा दरारा निर्माण झाला. नंतर 1797 साली ऑस्ट्रिया आणि फ्रान्स मध्ये कॅम्पो फॉर्मिओ नावाचा करार झाला ज्याचा प्रादेशिक विस्तार करण्याचा फायदा फ्रान्सला झाला. नेपोलियनने पुढे रोमपर्यंत आक्रमण केले. नेपोलियनने व्हेनिस वरही आक्रमण करुन त्यांना शरण येण्यास भाग पाडले. फ्रेंच सरकारने नेपोलियनला इंग्लंडवर आक्रमण करण्याची ऑफर दिली परंतु नेपोलियनने इजिप्तवर आक्रमण करुन इंग्लंडचे भारताबरोबर असलेले व्यापारमार्ग उध्वस्त करण्याची योजना आखली, करण फ्रेंच सैन्य अद्याप ब्रिटिश रॉयल नेव्हीविरुद्ध लढण्यास तयार नाही असे नेपोलियनचे मत होते त्यामुळेच नेपोलियनने 1798 साली झालेल्या इजिप्तच्या लढाईत तुर्की सैन्याचा नाश करून नेपोलियनच्या लष्कराने माम्लूक राज्यकर्त्यांविरोधात मोठा विजय मिळवला.या लढाईत हजारो लोक मारले गेले, नंतर नेपोलियनच्या  देखरेखीखाली तिथे स्थानिक प्रशासन निर्माण केले गेले. 1799 साली झालेल्या ब्रूमेअरच्या उठावानंतर नेपोलियनचे नाव  फ्रान्सच्या राजकारणात अग्रक्रमाने घेतले जाऊ लागले. सन  1800 साली नेपोलियन ने परत एकदा ऑस्ट्रियचा पराभव केला. पुढे दोन वर्षांनी फ्रान्सने इंग्लंडबरोबर शांतता करार केला, दरम्यान नेपोलियनने  फ्रान्समध्ये आर्थिक व सामाजिक स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न केले त्याचबरोबर त्याने  1804 साली नेपोलियन कोडची निर्मिती केली ज्यामुळे फ्रेंचची कायदेशीर प्रणाली सुसंगत होण्यास मदत झाली. त्याचबरोबर परिसमधल्या नॉट्रे डोम च्या कॅथेड्रलमधील एका मोठ्या सोहळ्यात नेपोलियनला फ्रान्सचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आले. 

                      

पुढे 15 वर्ष नेपोलियन  अनेक छोट्या मोठ्या लढाया लढल्या, ब्रिटिश लष्कराला पायबंद घालण्यासाठी नेपोलियनने बरेच प्रयत्न केले. 1812 सालच्या रशियाविरुद्धच्या लढाईत नेपोलियनचे बरेचसे सैन्य रशियन छळछावणीत, युद्धात अथवा उपासमारीने मारले गेले येथूनच नेपोलियनच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. 1813 सालच्या ऑस्ट्रिया, प्रशिया, रशिया आणि स्वीडिश या युतीविरुद्धच्या लढाईत नेपोलियनच्या सैन्याचा लेप्झिग येथे पराभव झाला,  फ्रान्सवर  आक्रमण करून त्याला एल्बा येथे कैदेत ठेवण्यात आले, नेपोलियन सिंहासनावरून पायउतार झाला. दोन वर्षांनंतर कैदेतून मुक्त झाल्यानंतर नेपोलियनने आपले सैन्य जमावले आणि ब्रिटन आणि त्यासोबत युती असलेल्या राष्ट्रांविरोधात युद्धाची घोषणा केली. परंतु या लढाईत ब्रिटनच्या वेलस्ली या सेनपतीच्या सैन्यासमोर नेपोलियनचा पराभव झाला, यावेळेस नेपोलियनला अटलांटिक महासागरात ब्रिटिश सत्तेच्या अंमलाखाली असलेल्या सेंट हेलेना बेटावर कैदेत ठेवण्यात आले जेथे 1821 साली नेपोलियनचा मृत्यू झाला. 

 एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊनही आपल्या लष्करी युद्धकौशल्यांच्या बळावर अख्ख्या युरोपवर आपले वर्चस्व सिद्ध करणाऱ्या या पराक्रमी योध्याला सलाम.

© ऋषिकेश पंचवाडकर 

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s