फार पूर्वीपासून भारतीय संस्कृति ही भारतीयांच्या मनामनात खोलवर रुजलेली आहे त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीला आध्यात्माचा बराच मोठा वारसा लाभलेला आहे. भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीनुसार भारतीय अध्यात्माच्या इतिहासाचा बराचसा भाग हा विष्णु देवतेच्या विविध अवतारांवर आधारलेला आहे. अगदीच उदाहरणे द्यायची झाली तर रामायण, महाभारत आणि त्यातील काही कथा ज्या कथांशी आपण एक भारतीय म्हणून थोडेफार का होईना परिचित आहोत. त्याच विष्णूचा सहावा आणि चिरंजीव अशी मान्यता असलेला परशुराम अवतार हा विष्णु देवतेचाच एक अवतार समजला जातो, त्यानुसार दरवर्षी भारतात परशुराम जयंतीसुद्धा साजरी केली जातो. त्याच परशुरामावर आधारित थोड्या वेगळ्या अंगाने लिहिली गेलेली राजीव पुरुषोत्तम पटेल लिखित कादंबरी म्हणजे \”वैदिक\”. अगदीच आपल्या सिनेमॅटिक भाषेतच बोलायचं झालं तर वन टाईम वाचण्यासारखी ही कादंबरी आहे.
परशुरामाचे व्यक्तिमत्व जन्माने ब्राम्हण असूनही त्याच्यात असलेले क्षत्रियांचे गुण ही या कादंबरीत रेखाटले आहेत, ऋचिकपुत्र जमदग्नि आणि त्यांची पत्नी रेणुका हे लोककल्याणास्तव भृगु आश्रमापासून दूर दक्षिणेत जनजिवन स्थिर करून नवीन संस्कृती रुजवण्यासाठी यासाठी प्रयत्न कात असतानाच तत्कालीन बरेच चांगले सामाजिक बदल घडल्याची वर्णने वैदिक कादंबरीतून वाचायला मिळतात, परंतु सकारात्मक गोष्टींबरोबरच नकारात्मक घडामोडींचे वर्णनही कादंबरीत आहेत जसं की, हेहेय कुळात जन्मलेल्या, उन्मत्त सहस्त्रअर्जुन नावाच्या राजाकडून जमदग्नींच्या आश्रमातील कामधेनू गाय पळवली जाते, मोठ्या भावंडांसमावेत परशुराम आपली गाय आणण्यासाठी सहस्त्रार्जुनाच्या महाली जातात त्यावर अपमानाचा बदला म्हणून एक दिवस जमदग्नींच्या आश्रमात कोणीच दिसत नाही (परशुरामही प्रायश्चित्त घेण्यासाठी नर्मदेश्वर आश्रमापासून एक वर्षासाठी बाहेर गेलेले असतात) आणि ही संधी साधून सहस्त्रार्जुन जमदाग्नीचे 21 तुकडे करून त्यांची हत्या करतो. तदपासून ते महेंद्रगिरी पर्वतावर परशुराम समाधी घेऊन सूक्ष्म रूपात विलीन होतात इथपर्यंतचा परशुराम यांचा जीवनप्रवास आणि त्यांचे जीवन कार्य या कादंबरीतून वाचकांसमोर मांडण्यात आले आहे. वडिलांच्या निधनांनातर संतापा्चया भरात 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा घालणारा परशुराम ते दोन दोन तीन तीन वर्षे समाधीतून बाहेर न निघणारा परशुराम या दोन्ही टोकांच्या मधला गॅप हा कादंबरी पहिल्यांदा वाचणाऱ्या वाचकाला नक्कीच जागेवर खिळवून ठेवतो.
वडिलांच्या क्रूर हत्येनंतर परशुराम नर्मदेश्वराच्या आश्रमात परततात, वडिलांच्या हत्येची बातमी कळताच प्रतिज्ञा केल्यानंतर नर्मदा किनारी असलेल्या आपल्या वडिलांच्या आश्रमातून बाहेर पडलेले परशुराम आणि त्यानंतर कातवीर्य अर्जुनाचा केलेला वध या घटनांच्या वर्णनात पहिला भाग संपून दूसरा भाग सुरू होतो. दुसऱ्या भागात परशुराम संपूर्ण भारत भ्रमण करतात, शिल्लक राहिलेले अहंकारशून्य राजे महाराजे जिवंत असतात त्यांच्या भेटी घेतात, तद्नंतर अविरत कष्ट करुन सध्याची असलेली कोकण भूमी निर्माण केलेल्याचे वर्णन राजीव पटेल यांनी वैदिकमध्ये सुंदररीत्या केलेले आहे. हिमालयाच्या डोंगररांगांमधून परशुराम आपले भारतभ्रमण चालूच ठेवतात. त्यांच्या समाधी काळात त्यांची सेवा करणारा अकृतव्रण तो महेंद्रगिरी पर्वत, त्याचप्रमाणे आपले शिष्य असलेल्या भीष्मांचार्यांशी झालेलं परशुरामाचं युद्ध या सर्व घटनांचे यथायोग्य वर्णन वैदिकमध्ये आपल्याला आढळते.
साधारणतः परशुरामाच्या आवताराचा काळ हा श्रीरामांच्या आवतारा्चया आधीचा असल्याने त्या काळातील बऱ्यापैकी दऱ्याखोऱ्यात आणि घनदाट जंगलात वस्ती करुन रहात असलेल्या समाजाचे वर्णन, त्यांच्या जगायच्या पद्धती आणि परशुरामाचे वडील जमदग्नी यांनी घडवून आणलेले सामाजिक बदल यांचे विश्लेषण उत्कृष्ठपणे या कादंबरीत करण्यात आले आहे. काही ठिकाणी कादंबरी थोडी फार फंटासाईझ वाटते, परंतु तुमच्या आमच्यासारख्या वाचनप्रिय व्यक्तींना ते चालतं. कादंबरीतील काही घटना या युद्धप्रसंगांवर आधारित आहेत, परंतु परशुरामाच्या बाबतीत ही द्वंदे दुहेरीरित्या प्रस्तुत करण्यात आलेली आहेत, उदाहरणच द्यायचं झालं तर कादंबरीच्या दुसऱ्या भागात मानसिक शांतीसाठी परशुराम सबंध भारतात अनेक मोठ्या ऋषिमुनींच्या गाठीभेटी घेतात त्याचे वर्णन आहे ज्याद्वारे लेखकाने परशुरामाचे मानसिक द्वंद्व वाचकांसमोर ठेवले आहे आणि इतर युद्धांबद्दल बोलायचं झालं तर रणांगणात अजिंक्य असणाऱ्या परशुरामाचे आणि त्या युध्दप्रसंगांचे रंजक वर्णनही लेखकाने वाचकांसमोर ठेवले आहे.
एक देवता म्हणून कादंबरीत परशुरामाचे कार्य आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचा, आदर कादंबरीत राखला गेलेला आहे. कादंबरीत एक प्रसंग आहे जिथे सहस्त्रार्जुन दत्तात्रेयाचे दर्शन घेऊन गिरनार पर्वत उतरु लागतो आणि त्याचवेळेस परशुराम झपाझप गिरनार चढू लागतात आणि गिरनार पर्वताच्या मध्यावरच सहस्त्रार्जुनाची परशुरामांच्या नजरेशी नजरानजर होते, परंतु परशुराम पर्वत चढतच जातात त्यांना कुठे कल्पना असते की यालाच मारून पृथ्वीतलावर रक्तरंजित क्रांतीचा शंख आपण फुंकणार आहोत आणि कातवीर्य उतरतच जातो कारण त्यालातरी कुठे माहीत असतं की आपण साक्षात आपल्या मृत्यूची मूर्ती पहात आहोत, दोघेही आपपल्याच तंद्रीत असतात, परंतु दोघांच्याही मनात एकच प्रश्न घोळवत असतो की हा कोण होता?. कातवीर्य अर्जुनाच्या वधाआधीचा हा प्रसंग आहे जिथे कादंबरीच्या ट्विस्टला सुरुवात होते. कार्तवीर्य अर्जुनाच्या वधानंतर परशुराम अनेक परिचित अपरिचित ऋषितुल्य व्यक्तिमत्वांच्या गाठीभेटी घेतात, दरम्यान आपल्याकडे असलेलं शिवधनुष्य जे परशूरमांनी मिथीलेच्या राजाच्या स्वाधीन केलेलं असतं ते सीता स्वयंवरात श्रीरामांकडून प्रत्यंचा लावण्याच्या प्रयत्नात तुटतं त्यामुळे संतापलेले परशुराम मिथीला नगरीत दाखल होतात, ज्याठिकाणी श्रीराम आणि परशुरामाच्या भेटीचे उत्तम वर्णन केलेले आहे. या प्रसंगानंतर मात्र परशुराम पूर्णपणे एकांतात जीवन व्यतीत करतात, आपल्या आश्रमात ओळख लपवून ब्रम्हास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या आपल्या शिष्याची म्हणजेच महाभारतातील कर्णाची ते कठोर परीक्षा घेतात ज्यामुळेच पुढे कुरुक्षेत्रावरील युद्धात कर्णाला आपल्या ब्रम्हविद्येचे विस्मरण होत. या वरुन परशुराम ही महाभारत काळातही अस्तित्वात असल्याची नोंद वैदिकमध्ये आढळते, ज्यानंतर परशुराम अवतार संपवून समाधीत विलीन होतात.
आपल्यापैकी ज्या वाचकांना थोडीफार अध्यात्माबद्दल थोडी फार ओढ आहे मग वाचक वर्ग हा ज्येष्ठ असो वा कनिष्ठ, आशा वाचकांसाठी वैदिक ही एक वेगळ्या धाटणीची, एखाद्या देवतेच्या अवतारकार्याबद्दल थोड्या वेगळ्या अंगाने विचार करून लिहिलेली ही कादंबरी आहे, अध्यात्म हा व्हास्ट विषय असला तरी ज्यांना कादंबरीवाचनात सखोल इंट्रेस्ट आहे त्यांनी वैदिक कादंबरी एकवार नक्कीच वाचावी हे एक वाचक म्हणून मी नक्कीच सजेस्ट करेन, बाकी लेख मोठ्ठा होतोय त्यामुळे वैदिक कादंबरीपुरतं एवढंच.
हा लेख आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
धन्यवाद.
छायाचित्र स्त्रोत: Dainik Bhaskar
-© ऋषिकेश पंचवाडकर
Khupch sundar👍
LikeLike
छान वैदिक कादंबरी बद्दल अतिशय उपयुक्त माहिती.
LikeLike
Thank you! 👍
LikeLike
धन्यवाद 👍
LikeLike
छान रसग्रहण कलेय पुस्तकाचे
LikeLike
Thanks 👍
LikeLike