लता मंगेशकर – सांगीतिक वलयाची नव्वदी

Lata Mangeshkar

खरंतर लिहायला कुठून सुरुवात करावी कळत नाहीये, कारण त्यांच्या पासून मी तिसऱ्या पिढीत वगैरे जन्मलेला असेन. माझ्या अगोदरच्या दोन पिढ्या ह्या त्यांचे सूर ऐकता ऐकता मोठ्या झालेल्या आहेत; त्या अनुषंगाने मी फारच लहान ठरतो. आज भारताच्या अनेक रत्नांपैकी एक रत्न असलेला भारताचा सूर वयाची नव्वदी पार करतोय . भारताची स्वतःची अशी जी रत्नं आहेत त्यातलंच सांगीतिक क्षेत्रात अग्रक्रमाने घेतलं जाणारं , गान-सरस्वती अशी उपाधी मिळालेलं एकमेव नाव म्हणजे भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर. जवळपास सहा तें सात दशकं भारतीय संगीत क्षेत्राच्या चाहत्यांवर आपल्या सुरांनी भुरळ घालणाऱ्या दीदींचा जन्म 28 सप्टेंबर १९२९ साली मध्यप्रदेशातल्या इंदौर शहरात झाला. पंडित मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि त्यांच्या पत्नी सुधामती यांच्या पोटी जन्मलेल्या दीदी; मीना, आशा, उषा आणि श्री हृदयनाथ मंगेशकर या पाचही भावंडांमध्ये सर्वात थोरल्या. अगदी सुरुवातीच्या काळात रहायला गोव्यात असलेलं मंगेशकर कुटुंब हे हार्डीकर कुटुंब म्हणून ओळखलं जायचं, मास्टर दीनानाथ मंगेशकरांचे वडील म्हणजेच दीदींचे आजोबा गोव्याच्या मंगेशी मंदिरात शिवलिंगावर अभिषेक करण्यास जात असत, त्यामुळे मंगेशी गावचं कुटुंब अशी ओळख मिळावी म्हणून मास्टर दीनानाथांनी हार्डीकर आडनांव बदलून मंगेशकर आडनाव ठेवलं. मास्टर दीनानाथ मंगेशकर हे प्रख्यात शास्त्रीय गायक आणि थिएटर आर्टिस्ट होते, दीदींच्या आईकडच्या आजोळकडून दीदींना गुजराती लोकसंगीत गाण्याचा वारसा मिळाला. वडिलांकडून फार लहानपणापासून संगीताचे धडे गिरवणाऱ्या दीदींनी पाचव्या वर्षापासूनच त्यांच्या वडिलांच्या संगीत नाटकांत काम करण्यास सुरुवात केली.

सन १९४२ साली मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे हृदय विकाराने निधन झाले त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी लतादिदींवर येऊन पडली. वडिलांकडून मिळालेला संपन्न वारसा आणि नवयुग चित्रपटाच्या मालकाशी म्हणजेच मास्टर विनायक यांच्याशी असलेले घरचे संबंध यांच्या आधारे १३ वर्षांच्या दीदींनी १९४२ साली प्रदर्शित झालेल्या ‘किती हसाल’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा आपल्या आवाजात गाणं रेकॉर्ड करून सांगीतिक व नाट्य कारकीर्दीस सुरुवात केली. त्यानंतर १९४२ सालीचा नवयुग चित्रपट निर्मित ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटात लतादीदींना छोटा रोल करण्याची संधी मिळाली याच चित्रपटात लतादीदींनी ‘ नटली चैत्राची नवलाई’ हे गाणं गायलं. १९४६ साली दत्ता डावजेकरांनी ‘आपकी सेवामे’(१९४६) या चित्रपटासाठी कंपोज केलेलं गाणं गाऊन हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं पाहिलं पाऊल टाकलं. त्याच्याच एक वर्षभर आधी १९४५ साली दीदींनी आपलं बस्तान मुंबईत बसवलं. मास्टर विनायक यांनी (नवयुग चित्रपट निर्मितीचे मालक आणि मंगेशकर घराण्याचे मित्र) यांनी लता दीदींबरोबरच अशादिदींनाही आपल्या हिंदी चित्रपटात रोल देण्यास सुरुवात केली त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे ‘बडी माँ’ (१९४५). मास्टर विनायक यांच्या निधनानंतर साधारण १९४८ साली संगीतकार गुलाम हैदर यांनी प्रोड्युसर शशधर मुखर्जी यांच्याशी ओळख करून दिली. परंतु मुखर्जी यांच्याकडून नकार मिळाल्यामुळे गुलाम हैदर यांनीच १९४८ सालच्या एका चित्रपटात ‘दिल मेरा तोडा, मुझे कहिका ना छोडा’ या गाण्यासाठी लतादीदींची निवड केली. बऱ्यापैकी प्रसिद्ध झाल्यावर हिंदी गाण्यांसाठी मराठी आवाज आणि आवाजाचा मराठी बाज (Accent) यामुळे दीदींवर टीकासुद्धा झाली; त्यामुळे लतादीदींनी एका उर्दू शिक्षकाकडून उर्दूचे धडे गिरवले. १९४९ साली प्रदर्शित झालेल्या ‘महाल’ चित्रपटासाठी लतादीदींनी गायलेलं ‘आयेगा आनेवाला’ गाणं प्रचंड हिट झालं. १९५० नंतरच्या जवळपास सर्व प्रसिद्ध अभिनेत्रींसाठी लतादीदी हा एक अतिशय गरजेचा आणि महत्वाचा आवाज बनला, लतादीदींनीही जवळपास सर्वच अभिनेत्रींसाठी आपला आवाज दिला. नर्गिस, वहिदा रेहमान, माधुरी दीक्षित ते अगदी प्रीती झिंटापर्यंत लता मंगेशकर या आवाजाची जादू कायम राहिली (अर्थात ती आजही कायम आहेच). १९५० च्या दशकापासून चित्रपटसृष्टीकडे बऱ्यापैकी कलाकारांचा ओढा वाढत होता, त्याच दशकातल्या नौशाद अली, मदन मोहन, एस डी बर्मन, शंकर- जयकिशन, कल्याणजी- आनंदजी, सी. रामचंद्र, सलील चौधरी, हेमंतकुमार या सगळ्या दिग्ग्ज संगीतकारांसाठी मीनाबझार(१९५०), आधी रात(१९५०), अफसाना(१९५१), दिदार(१९५१), बिज्जू बावरा(१९५२), मदर इंडिया(१९५७), देवदास(१९५५) अशा अनेक चित्रपटांसाठी लतादीदींनी आपला आवाज दिला.

१९५८ च्या ‘मधुमती’ चित्रपटासाठी गायलेल्या ‘आजा रे परदेसी’ गाण्यासाठी दीदींना बेस्ट प्लेबॅक फिमेल सिंगरसाठीचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. त्याचप्रमाणे १९६० च्या दशकात ‘मुघल – ए – आझम’ मधील ‘प्यार किया तो डरना क्या’ गाणं जे आजही दीदींच्या चाहत्यांना भुरळ घालतंय, तसेच १९६७ साली भारताचे त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत लतादीदींनी भारतीय युद्धावर आधारित सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गायलं, दीदींच्या सुरांची भुरळ पंडितजींनाही पडली. एस. डी. बर्मन यांच्या समवेत दीदींनी बऱ्याच चित्रपटांसाठी गायन केलं जस कि ‘पती पत्नी’(१९६६), ‘अभिलाषा’(१९६९) त्याचप्रमाणे एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या काही डुएट गाण्यांसाठी सुद्धा लतादीदींनी आपला आवाज दिला मोस्टली श्री.किशोर कुमार यांच्यासोबत लतादीदींनी काही डुएटस गायली त्यापैकी ज्वेल थीफ मधलं(१९६७) ‘आसमां के नीचे’, आराधना(१९६५)‘बागो में बहार है’, आराधनातलं(१९६५) ‘गाता रहे मेरा दिल’, तसेच ‘कोरा कागझ’, ‘हा मैने कासम ली’; ही गाणी प्रचंड हिट झाली आणि आजतागायत या गाण्यांची जादू कायम आहे. किशोरकुमार यांच्याप्रमाणेच लतादीदींनी मन्नाडे, मुकेश आणि मोहम्मद रफी साहेब यांच्याबरोबरही अनेक डुएटस गायली. फक्त हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांबरोबर संगीत क्षेत्रात काम न करता लतादीदींनीही मराठी चित्रपटसृष्टीतील सुद्धा पंडित हृदयनाथ मंगेशकर, श्रीनिवास खळे, सुधीर फडके, यांच्यासारख्या मराठीतील दिग्ग्ज संगीतकारांच्या अनेक रचनांना आपला श्रवणीय आवाज गाण्यासाठी वापरला. दरम्यान संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळणाऱ्या रॉयल्टीवरुन लतादीदी आणि मोहम्मद रफी या दोन दिग्गजांमध्ये काही काळ वाद निर्माण झाला, शेवटी दोघांनीही एकमेकांसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला; इतक्या टोकापर्यंत हा वाद जाऊन पोहोचला, पण कालांतराने काही कलाकारांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला.

७०च्या दशकात लतादीदींनी मोस्टली लक्ष्मीकांत- प्यारेलाल आणि पंचमदा म्हणजेच आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली बरीच गाणी गायली, दरम्यान ७३ साली लतादीदींना आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बिती ना बिताई रैना’ या गाण्यासाठी बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगरसाठी फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. ७८ साली ‘सत्यम शिवम सुंदरम’ चित्रपटाच्या थीम सॉंग साठी दीदींनी आपला आवाज दिला. त्यांच्या अद्वितीय अशा यशामुळे लतादीदी भारतीय संगीत क्षेत्रातील अतिशय सामर्थ्यवान महिला ठरल्या, दीदींनी ८०चं दशकही आपल्या सुरांच्या दमावर बरंच गाजवलं. मराठी, हिंदी बरोबरच लतादीदींनी बंगाली, इंग्लिश, श्रीलंकन आणि तत्सम बऱ्याच भाषांमध्ये गाणी गायली आणि ती गाणी मराठी आणि हिंदी गाण्यांऐवढीच हिट ठरली. ८०च्या दशकातील बप्पी लहरी, अनु मलिक, ए. आर. रेहमान, जतीन ललित इत्यादी नवीन संगीतकारांच्या नानाविध रचनांनाही लतादीदींनी आपला आवाज दिला, नवीन संगीतकारांनाही लतादीदींच्या सुरांची भुरळ पडली असं म्हणलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. सुरेश वाडकर, एस. पी. बालसुब्रह्मण्यम, उदित नारायण, कुमार सानू, रुप कुमार राठोड, सोनू निगम, हरिहरन, अभिजित भट्टाचार्य या त्याकाळच्या अनेक नवख्या कलाकारांसोबत लतादीदींनी अनेक गाणी गाईली. त्याचप्रमाणे यशराज फिल्म्स निर्मित जवळपास सर्व चित्रपटांसाठी दीदींनी गाणी गायली. ९० साली पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेल्या ‘यारा सिली सिली’ गाण्यासाठी लतादीदींना बेस्ट प्लेबॅक सिंगर फिमेलसाठी अवॉर्ड मिळाला. १९९९ साली लता दीदींना ‘झी सिने अवॉर्ड फॉर लाईफटाईम आचिव्हमेंट’ प्रदान करण्यात आला तसेच त्यानंतर लतादीदींना राज्यसभेच्या सदस्य म्हणूनसुद्धा घोषित करण्यात आले होते.

२००१ साली लतादीदींना बाराचा भारताचा सर्वोच्च सन्मान असलेला भारतरत्न असलेला सन्मान मिळाला, दीदींना भारतरत्न म्हणून गौरवण्यात आले. लतादीदींनी मराठीत ज्ञानेश्वर माऊली, गणपतीची आरती, मराठी गाणी – लता मंगेशकर, मंगलप्रभात – भूपाळी आणि भक्तीगीते, हा सागरी किनारा, क्षण अमृताचे, मराठी डिव्होशनल, मोगरा फुलला, गणपतीची अष्टविनायक गीते अशा अनेक अल्बम्सना आपला आवाज दिला. लतादीदींच्या मराठीतील अभंगांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांवरील काही अल्बमही दीदींच्या चाहत्यांना भुरळ पाडतात त्यातीलच काही अल्बम म्हणजे ‘मराठा तितुका मेळवावा’(१९६३) आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं ‘शिवकल्याणराजा’. भारतरत्न मिळण्याआगोदर लतादीदींना पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार इत्यादी अशा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

२००१ सालीच पुण्यात मास्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची स्थापना करण्यात आली. लतादीदींनी निरनिराळ्या फाउंडेशनसाठी, गरजूंसाठी आणि इतर नैसर्गिक आपत्तींसाठी, वेल्फेअर ट्रस्टसाठी मदतीचा हात म्हणून बऱ्याचदा निधिदान केले आहे. सहा- सात दशकं भारतीय संगीत क्षेत्रावर असलेली मजबूत पकड यामुळे भारतातील सध्याच्या संगीत क्षेत्राबाबत दीदी म्हणतात, ‘मला असे वाटते आज जे संगीत तयार केले जात आहे त्यासाठी मी पात्र नाही, मी पूर्वी काय गायले आहे आणि आता काय बनवित आहे यामध्ये काही फरक आहे. मी हे संगीत वाईट आहे असे म्हणत नाही, परंतु सध्याच्या संगीतात बराच धडधडाट आहे.’

दिलीपकुमार यांनी लतादीदींबद्दल म्हटले होते की ‘लताच्या आवाजा एवढा परिपूर्ण आणि संस्कारक्षम आवाज चित्रपसृष्टीत कोणत्याच गायकाचा नाही, लताशी तुलना करणे आणि स्पर्धा करणे कोणालाही अवघड आहे कारण तिने संगीताची काळजी करणाऱ्या प्रत्येकात चांगली गुंतवणूक केली आहे- प्रत्येकात एक लता मंगेशकर बसलेली आहे. जवळपास २० भाषांमधून २५००० सोलो आणि डुएट गाणी गाण्याचा चमत्कार फक्त लतादीदीच करु शकतात. १९७४ ते १९९१ सालापर्यंत सर्वाधिक गाणी गाऊन रेकॉर्ड करण्याचा लतादीदींचा विक्रम Guinness World Records book मध्ये नोंद आहे. असो लतादीदींबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, आज लतादीदी ९१ वर्षाच्या होत आहेत. सात दशकं बहुदा त्याहून अधिक काळ आपल्या लाडक्या चाहत्यांवर सुरांची मुक्त उधळण करणाऱ्या या गानसरस्वतीला सलाम.

– ऋषिकेश पंचवाडकर

Image Source: Google

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s