किल्लारी – ३० सप्टेंबर १९९३

 सप्टेंबर क्रायसिस – ०१ 

आभाळाकडे शून्यात नजर लाऊन अरविंदा बसला होता; रडून रडून डोळे लालबुंद झाले होते. तरीही त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते, मधूनच आपल्या ढासळलेल्या घराच्या आवशेषांकडे बघून मांडीत डोकं घालून तो हुंदके देत होता. आपल्या आजूबाजूला बरीच पळापळ चालू आहे, बराच आक्रोश चालू आहे याचं भानही त्याला राहिलेलं नव्हतं. अरविंद घोडमारे, रोज पहाटे पहाटे उठून १० किलोमीटरवर असलेलं आपलं शेत कसायला जाणारा एक शेतकरी. काल शेतातला राबणारा गडी कामानिमित्त शहरात गेला त्यामुळं अरविन्द आपल्या ८० वर्षाच्या म्हाताऱ्या बापाला, एका सोन्यासारख्या लेकीला, पाळलेल्या गोठ्यातल्या प्राणप्रिय जनावरांना,  अन मंडळींना घरीच थांबवून शेतातच मुक्कामाला थांबला अन त्यामुळंच बचावला.  अर्ध्या रात्रीत निसर्गानं अरविंदाच्या घराचं अन घरासोबतच घरातल्या माणसांचं सगळं होत्याचं नव्हतं करुन टाकलं. अरविंद मनाच्या उध्वस्त अवस्थेत गेला होता, खांदा टेकून रडायलासुद्धा कोणी घरातलं उरलं नव्हतं. गावातल्या जवळपास प्रत्येक घरात आज हेच दृश्य होतं. रोज लोकवास्तव्यानं गजबजलेल्या गावात आज स्मशान शांतता पसरली होती. तेवढ्यात अरविंदासोबत  शेतावर राबणारा गडी  ‘अरविंद मामा, ओ अरविंद मामा’  म्हणता म्हणता पळत  येताना त्याला दिसला, अरविंदानं एकदा त्या गड्याकडं कटाक्ष टाकला अन न रहावुन आभाळाकडं बघत जोरात हंबरडा फोडला. 

(वरील गोष्ट काल्पनिक आहे). 


किल्लारी –  ३० सप्टेंबर १९९३ 

२९ सप्टेंबर १९९३ चा दिवस गणपती विसर्जनाचा दिवस होता, महाराष्ट्रात गणपती विसर्जनाचा सोहळा पार पाडून अवघा महाराष्ट्र शांततेत झोपला होता. महाराष्ट्रातल्या लातूर जिल्ह्यातील किल्लारी गांव  पहाटेच्या साखर झोपेत होतं, गावातही गणपती विसर्जन उत्साहात पार पडलं होतं, त्याव्यतिरिक्त ईतर नित्यकर्म आटोपून गांव दमून भागून झोपलं होतं. अजून उजाडायला तसा उशीर होता. गावात दूरवर कुठेतरी कुत्री जोरजोरात भुंकत होती. गोठ्यातली जनावरं दिवसभर शेतात राबून शांत झाली होती.  पहाटे ३:५६ वाजता जमिनीला हादरे बसू लागले, अन बघता बघता सगळं गांव जमीनदोस्त झालं . महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातल्या अनेक भूकंपांपैकी  अत्यंत विदारक आणि विध्वंसक अशा प्रकारचा हा किल्लारीचा भूकंप होता, ह्यालाच लातूरचा भूकंप म्हणूनसुद्धा ओळखले जाते. किल्लारीपुरताच हा भूकंप मर्यादित नव्हता तर आजूबाजूच्या जवळपास ५० गावांना या भूकंपाचा हादरा बसला होता. या भूकंपाचा सर्वाधिक फटका उस्मानाबाद जिल्हा आणि लातूर जिल्ह्याला बसला.  ६. ०४ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या किल्लारीच्या भूकंपात सुमारे ३०००० – ३५००० घरांची पडझड झाली, ही घरं पूर्णतः उध्वस्त झाली. या भूकंपात  जवळपास ८००० माणसे मृत्युमुखी पडली, १६००० लोक जखमी झाले, १६००० जनावरं मृत्युमुखी पडली, किल्लारी जवळपासच्या ५० – ५५ गावातल्या २ लाखापेक्षा जास्त घरांना या भूकंपाचा धक्का बसून तडे पडले. ३० सप्टेंबर ची मध्यरात्र ही महाराष्ट्रातील लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांसाठी काळरात्र (नाईटमेअर) ठरली. सांगितलेल्या गोष्टीतल्या अरविंदाप्रमाणे कितीतरी लोक उघड्यावर पडले, त्यांचं आयुष्य उध्वस्त झालं, संसार उध्वस्त झाले. ह्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या, उध्वस्त झालेल्यांच्या आठवणीत आजही ३० सप्टेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळला जातो. असं सांगितलं जातं की किल्लारीच्या भूकंपानंतर जवळपास वर्षभर लातूर जिल्ह्याला भूकंपाचे धक्के जाणवत होते. ही घटना फक्त इमॅजिन जरी केली तरी अंगावर सरसरून काटा उभा रहातो तुलनेत लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जनसंख्येने अतिशय धैर्याने या नैसर्गिक आपत्तीला तोंड दिलं होतं असं म्हणलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. अवघ्या काही क्षणांत किल्लारी उध्वस्त झालं  ३० सप्टेंबर १९९३ हा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत विध्वंसक ठरला. कम्युनिकेशनचा आभाव म्हणा किंवा अप्रगत असलेलं तंत्रज्ञान म्हणा आजच्या मीडियाच्या तुलनेत ९३ सालचा न्यूज मीडिया हा इतका रिचेबल नव्हता. 

 ३० सप्टेंबरला उडालेल्या हाहाकारात जखमींच्या मदतीसाठी आणि उपचारांसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या, तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. शरद पवार यांनी स्वतः दुर्घटना स्थळांना भेटी देऊन नुकसान भरून काढण्यासाठी विविध उपाय योजनांची अंमलबजावणी केली. किल्लारीतील रहिवाश्यांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने अनेक स्वयंसेवी संस्थांनी जमेल तशी मदत केली. दरम्यान तत्कालीन केंद्र सरकारने केंद्रीय अधिकाऱ्यांच्या व्हिजनखाली किल्लारीतील रहिवाश्यांच्या पुनर्वसनासाठी आणि रहिवाश्यांना नवीन घरे उपलब्ध करुन देण्यासाठी, तसेच नवीन घरे बांधण्यासाठी एक समिती स्थापन केली; ज्या समितीच्या अहवालात राज्यसरकारच्या पुनर्वसन धोरणावर सडकून टीका करण्यात आली होती. सर्वच गावांऐवजी काही गावांचेच पुनर्वसन करण्यात उरावे असे केंद्रीय समितीचे म्हणणे होते.  त्याकाळी अगदी परदेशातल्या न्यूज चॅनेलवरसुद्धा किल्लारीच्या भूकंपाची बातमी प्रसारित करण्यात आली. त्यामुळे बऱ्याचश्या बाहेरील देशांकडून पुनर्वसनासाठी मदतीचा ओघ सुरु झाला. महाराष्ट्र सरकारने  उमरगा तालुक्यातील जवळपास ५०एक गावांचे स्थलांतर आणि पुनर्वसन केले. लाखाच्या वर घरांची दुरुस्ती करण्यात आली. बऱ्याच अथक प्रयत्नांनंतर आणि लष्कराच्या मदतीने किल्लारीतील परिस्थिती बरीच आटोक्यात आली. परंतु या आपत्तीस फक्त निसर्गाला जबाबदार नसून काही प्रमाणात मनुष्यही जबाबदार असल्याचे घटनाक्रमांवरून लक्षात येते.किल्लारीतील नुकसानग्रस्त कुटुंबे आज बऱ्यापैकी सावरली आहेत. आज या घटनेला  २७ वर्षे पूर्ण होत आहेत, पुनर्वसन हि तशी दीर्घकालीन चालणारी प्रक्रिया आहे. 

पण आज जवळपास २७ वर्षांनंतर महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा (डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम) १९९३ सालच्या व्यवस्थापन यंत्रणेच्या तुलनेत बऱ्यापैकी सक्षम झाली आहे; आणि नक्कीच भविष्यातील किल्लारीसारख्या कोणत्याही नैसर्गिक आपत्तीशी दोन हात करण्यासाठी बऱ्यापैकी सज्ज आहे. परंतु पुनर्वसन झालं असलं तरी झालेलं नुकसान गमावलेले आप्तस्वकीय हे नुकसान तसं न भरुन निघणारं आहे, असं असलं तरी आज दोन दशकांपर्यंत किल्लारी दुर्घटनेच्या भयानक आठवणी आणि जखमा यांना खंबीरपणे तोंड देत आयुष्याचा गाडा हाकणाऱ्या किल्लारी दुर्घटनेतून बचावलेल्या वीरांना सलाम.


आपल्याला पोस्ट आवडली असल्यास, आपल्या प्रतिक्रिया / फीडबॅक कमेंट करुन नक्की कळवा. 


○ ऋषिकेश पंचवाडकर 


 

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s